Tuesday, October 07, 2008

खंडीत दिनक्रम - १

This is my feeble attempt to write a Marathi adaptation of "Broken Routine", a short story by Jeffrey Archer, my favourite author.

 

सुधीर रमेश सबनीस ह्यांच्या आयु़ष्यात सुरस असं फारसं काही नव्हतं. नावाची आद्याक्षरं सोडली तर. पण सबनीसांची त्याबद्दल काही तक्रार नव्हती. तशी त्यांची कशाबद्दलच काही तक्रार नव्हती. लहाणपणापासून नाकासमोर चालायची शिकवण मिळालेली. आणि नाकदेखील अत्यंत सरळ. पाणिदार डोळे, मोठे कपाळ, ऊंच आणि सडसडीत शरीरयष्टी. त्यांचा आवडता सोनेरी काड्यांचा चष्मा लावून ते सकाळी ऑफिसला जायला निघाले की एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीतील मोठे एक्झीक्युटीव्ह असावेत असे वाटे.

सबनीस हे फोर्ट्मधील एका मध्यम आकाराच्या आर्थिक कंपनीत म्हणजे अकाऊंटींग फर्ममध्ये हेडक्लार्क होते. गेली पंचवीस वर्षे ते तिथेच इमानेऎतबारे नोकरी करत होते. त्या दोन तपांमध्ये कंपनीचे मालक बदलले, रिसेप्शनिस्ट बदलल्या. एवढेच काय, पण खाली चहाच्या टपरीवाल्याने पण आपल्या दुकानाचे नाव बदलून “इंटरनॅशनल कोल्ड्रींक हाऊस” असे केले. बदलला नाही तो सबनीसांचा दिनक्रम.

रोज सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होई. दुधवाल्याने लावलेल्या अर्धा लिटरच्या दोन पिशव्या ते दारावरून काढून घेत. दोन कप चहा बनवला, एक स्वत:साठी आणि एक बायकोसाठी, की दोन मारी बिस्किटांबरोबर ते चहा संपवत. उरलेले दूध ते पातेल्यात काढून फ्रिजमध्ये ठेवत. मग ते पार्कला एक चक्कर मारायला जात. तेथे नेहेमीचे मित्र भेटले की थोड्या गप्पा होत. साडेसहापर्यंत ते घरी येत. एव्हाना दाराला इकॉनॉमिक टाइम्स आणि लोकसत्ता लागलेला असे. घरात बायकोने आले घालून चहा परत बनवलेला असे. पेपर आणि चहा होईपर्यंत पाऊणे सात वाजत. सव्वासातपर्यंत ते आंघोळ आणि योगासने आटपत. योगासनांतदेखील गेल्या पंचवीस वर्षांत एक आसन कमी नाही की जास्त नाही. सकाळचा नाश्ता आटपून ते साडेसातला घराबाहेर पडत आणि चालत ठाणा स्टेशनला जात. ह्यामागे व्यायाम कमी आणि पैसे वाचविणे हा मुख्य उद्देश होता. एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही बापाची व्यवस्थित काळजी घेत असले तरी “Old habits die hard” असे ते आपल्या सवयिचे समर्थन करत असत.

सात पंचेचाळीस ची व्ही. टी. फास्ट फलाटावर आली की ते इंडिकेटरखालील फर्स्ट क्लासचा डबा पकडीत आणि नेहेमीप्रमाणे मधल्या रांगेतील व्ही. टी. कडे तोंड असलेल्या सीटवर बसत. खरं म्हणजे त्यांचे डोंबिवलीपासून येणारे मित्र त्यात हातभार लावत. त्यांनाही सबनीसांची सवय माहीत होती आणि मित्रासाठी ते एवढा त्रास घ्यायला तयार होते.

0 Comments:

Post a Comment

<< Home