Wednesday, October 08, 2008

खंडीत दिनक्रम - २

बरोबर साडेनवाच्या ठोक्याला मस्टरवर सही करून ते आपल्या टेबलावरची “इनकमिंग” च्या गठ्ठ्यातली पहिली फाईल काढत. “आऊटगोईंग” चा गठ्ठा गणेशने आधीच उचलून नेलेला असे. त्याला सबनीसांचा अधिकार आणि त्या अधिकाराचा वापर करण्याची आवड ह्याचा प्रत्यक्ष परिचय होता. साडेबाराला ते नेहेमिच्या ग्रूपबरोबर जेवायला जात. दिड वाजता परत काम सुरू. साडेतीनला गणेशला सांगून एक कटींग मागवत आणि जरा उठून चहा पीत पीत उगाचच खिडकीपाशी जाऊन समोरच्या जाधवांशी नाहीतर त्यांच्या बाजुच्या देशपांड्यांशी देशाची परिस्थिती कशी वाईट आहे ह्यावर चहा थंड होईपर्यंत गरम चर्चा करून येत. घड्याळात पाच ठोके ऐकले की ते आवरायला घेत. त्यानंतर आलेले कुठलेही काम आता दुसरया दिवशी. पाच वाजता हातात असलेली फाईल ही त्या दिवशीची शेवटची. साडेपाचला सगळ्यांना “उद्या भेटू” असे सांगून ते बाहेर पडत.

व्ही. टी. स्टेशनवर आले की होम प्लॅटफॉर्मवर त्यांची सहाची ठाणा लोकल यायला अजून दहा मिनिटे तरी असत. समोरच्या स्टॉलवाल्याकडून ते मुगाच्या भज्यांचे पुडकं आणि ’आफ्टरनून’ घेत. बिझी बी चे ’राऊंड अँड अबाऊट’ गेल्या अनेक वर्षांत त्यांनी एकदाही चुकवले नव्हते. दादर येईपर्यंत ते बिझी बी चे ऐकून घेत त्यानंतर शब्दकोडं सोडवित. सोबतिला भजी असतच. गाडी मुलुंडला आली की पेपर व्यवस्थित घडी करून ब्रिफकेसमध्ये ठेवत आणि भज्यांचे पुडके ब्रिफकेसच्या वरच्या खणात वेगळं ठेवत. घरी येईपर्यंत त्यांना साडेसात होत. तोपर्यंत मिसेस सबनीस ह्या पण शाळेतून येऊन जेवणाच्या तयारीला लागलेल्या असत. बायकोबरोबर दिवसाच्या घडामोडींविषयी चर्चा करत करत जेवण आणि बातम्या ह्यांची चव घेईपर्यंत घड्याळाने नवाची जांभई दिलेली असे. गाद्या घालून दहा वाजता त्यांचा डोळा लागे. दुसरया दिवशी पुन्हा तोच परिपाठ.

0 Comments:

Post a Comment

<< Home