खंडीत दिनक्रम - ३
गुरुवारी दुपारपासूनच पावसाने जोर दाखवायला सुरुवात केली होती. जुलै मधले पहिले दोन आठवडे कोरडेच गेले होते. पण आज मात्र सारी कसर भरून काढायच्या उद्देशाने पाऊस कोसळत होता. बरयाच दिवसांच्या सरींचा फॉलोऑन मिळाला होता. त्यामुळे डावाचा पराभव टाळणे आवश्यक होते. गाड्या वेळेवर असतील का असा सबनीस विचार करीत असतानाच पाच वीसच्या सुमाराला गणेश त्यांच्या टेबलापाशी आला.
“साहेबांनी बोलावलंय”.
“अरे, त्यांना म्हणावं, माझी आता निघायची वेळ झाली. आज गाड्यांचं काही खरं दिसत नाही.”
“बरेच टेन्शनमध्ये आहेत. कुठल्यातरी फाईलमध्ये डोकं घालून हिशेब लागत नाही असं बडबडतायंत”
जरा वैतागानेच सबनीस ऊठले आणि त्यांनी साहेबांच्या केबिनचे दार ठोठावले.
“मे आय कम इन सर”.
साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडले तेव्हा सबनीसांच्या मनात वैताग आणि समाधान हे दोन्हीही मावत नव्हते. संध्याकाळचे साडेसहा वाजल्याचा वैताग आणि साहेबांची समस्या सोडविल्याचं समाधान. आपण रिकाम्या टेबल-खुर्च्यांनाच “ऊद्या भेटू” असे म्हटलॆ हे त्यांना फलाटावर आल्यावर लक्षात आले. होम प्लॅटफॉर्मवर गर्दी मावत नव्हती. वारूळ फुटून हजारो मुंग्या बाहेर पडाव्यात तशी माणसे येणारया गाडयांतून बाहेर पडत होती. सवयीप्रमाणे ते स्टॉलवर गेले आणि त्यांनी भज्यांचे पुडके आणि ’आफ्टरनून’ घेतला.
“साब, आज सब ट्रेन लेट हैं. बारीश से ट्रॅक मे पानी भर गया है.”
“सेंट्रल रेल्वे काय, कुत्र्याने ट्रॅकवर पाय वर केला तरी बंद पडते” असा विचार करत सबनीस इंडिकेटरखाली आले. समोरून एक कल्याण फास्ट येत होती. त्या सगळ्या गलक्यामध्ये ते लोकलमध्ये कधी शिरले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. आपली नेहेमीची सीट पकडावी म्हणून ते पुढे सरकले तर लक्षात आलं की सगळ्या सीट्स भरलेल्या आहेत. आणि आजुबाजुला ओळखीची कोणी माणसे दिसत नाहीत, सगळेच चेहरे अनोळखी. कशीबशी त्यांनी एक चौथी सीट पकडली.
समोर एक जोडपं आणि त्यांची दोन मुले त्यांच्या मांडीवर बसली होती. ती पोरं त्या गर्दीत आपल्या ऊच्छादाची भर घालत होती. बाजुला एक ’कॉलेजात जातो असे सांगून घरातून निघत असावा’ या वयाचा एक पोरगा कानामध्ये हेडफोन्स घालून सगळ्या डब्याला ’आपली आवड’ ऐकवत होता. एक फेरीवाला तिथेच पेनापासून ते चण्यांपर्यंत सगळं विकत होता. अचानक सबनीसांच्या लक्षात आलं, “सीट्सना कुशन नाही आहे. आपण सेकंड क्लासच्या डब्यात बसलो आहोत.”
0 Comments:
Post a Comment
<< Home