Tuesday, October 14, 2008

"आधी भरा मग बोला" - १

"कौस्त्या आला नाही अजून. कुठे गुण उधळतायंत चिरंजीव देव जाणे." शेखर साठे लिफाफा उघडता उघडता बायकोला वैतागून म्हणाले.

"जीम ला जातो म्हणाला. येईलच इतक्यात." सुधाताईंनी गेल्या बावीस वर्षांच्या शांतपणाने उत्तर दिले.

"तो सिक्स पॅक बनवायला जातो पण आमच्या पाकीटाची हाडं निघतात."

"आज एवढं तिरकं बोलायला काय झालं."

"बिल आलंय त्याच्या व्यायामशाळेचं. अडिचशे चा फटका आहे."

 

"बाबा. माझ्यासाठी फोन आला होता कुठला? आई चहा देतेस का?" कौस्तुभने बाईक अंगणात लावता लावता विचारलं".

"अहो पेशवे. आपल्या वाड्याचं नाव साठे वाडा आहे, शनिवार वाडा नाही आणि आई-वडिल म्हणजे भालदार चोपदार नाहीत." शेखर साठे अजूनही त्राग्यातच होते.

"शेखर फ़्रेश हो. देवाला नमस्कार कर. चहा देते." सुधाताई शांत असल्या तरी संस्कारांच्या बाबतीत तडजोड त्यांना मान्य नव्हती.

 

"तुझ्या व्यायामशाळेचं बिल आलंय. अडिचशे रुपये एका तासाचे?"

"नाही बाबा. काही तरी गडबड आहे. मी पूर्ण चार महिन्याचे पैसे भरले होते जूलैमध्ये. तुम्ही तपासा तुमचं बॅंक अकाउंट. ही बघा रिसीट पण इथेच आहे वरच्या ड्रॉवरमध्ये. तुम्ही चिल रहा बघू. मी उद्या जाऊन सगळं कंफ्युजन क्लिअर करून येतो. आणि जीम म्हणत जा हो. व्यायामशाळा कसलं. लंगोट लावून फिरतो का मी तिकडे?".

 

"मी आपली मदत करू शकते क?" रिसेप्शनिस्टने नम्रपणाने शेखरला विचारलं.

"हे बिल बघा. तुम्ही मला एक्स्ट्रॉ चार्ज केलंय."

"तुम्ही आधी बिल भरा आणि तुमची तक्रार आम्ही नोंदवून घेतो. सात दिवसात तुमच्या तक्रारीचे समाधान."

"अहो बिल भरा काय? चुकीचे आहे ते. मी तो जादा तास घेतलाच नव्हता."

"सॉरी सर. आमची पॉलीसी आहे. ’आधी भरा मग बोला’."

"अहो पण बिल भरणे म्हणजे ते मान्य करणे नाही का?"

रिसेप्शनिस्ट थोडी गडबडली. तिने बाजुच्या एका मुलाला विचारलं.

"मंदार, ह्यांचं बिल चुकीचं आहे म्हणतायंत. जरा बघतोस का?"

हातातला चहा खाली ठेवत आणि चष्मा सारखा करत मंदारने बिलावर नजर टाकली.

"काय प्रॉब्लेम आहे?"

"मला एका एक्स्ट्रॉ तासाचे पैसे लावले आहेत."

"पर्सनल ट्रेनर घेतला होता ना साहेब तुम्ही? मग त्यांना तासाला अडिचशे रुपये पडतात." मंदार बिल शेखरला परत देत म्हणाला.

"जो सेशन झाला नाही त्या तासाला सुद्धा?" शेखरने साळसुदपणे विचारले.

"झाला नाही कुठे? लिहिलंय कि इथे, सात नोव्हेंबर चा चार्ज आहे."

"अहो पण माझं ट्रेनिंग संपलं होतं ऑक्टोबर एन्ड ला. तुम्ही एक काम करा. तुम्ही मनोजला विचारा. मनोज म्हणजे मनोज देशमुख. तो माझा पर्सनल ट्रेनर होता."

"ते मी विचारतो. तुम्ही एक काम करा. इथे तक्रार लिहा. उद्या तुम्हाला अकाउंटींग फोन करेल. बिल सेटल झालंच म्हणून समजा."

"अहो पण माझी पावती बघा. आत्ताच करा की सेटल."

"आत्ता आम्ही फक्त पैसे घेऊन तुम्हाला त्याची पावती देऊ शकतो. इलाज नाही. पॉलीसी आहे."

0 Comments:

Post a Comment

<< Home