खंडीत दिनक्रम - ४
“चला आहे हे असं आहे” असा विचार करून त्यांनी भज्यांच्या पुडितून एक भजं उचललं आणि आफ्टरनून वाचायला सुरुवात केली. गाडीने घाटकोपर क्रॉस केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की बाजुच्या कॉलेजकुमाराने पुडक्यातून एक भजं उचलून तोंडात घातलं होतं. ते काही बोलणार तोच त्यांनी पाहिलं की ’हिरो’ पेपराची पुरवणी पण वाचत आहेत. भिडस्त असल्यामुळे ते काही बोलले नाहीत. पण त्या कार्ट्याला कसा धडा शिकवावा असा विचार त्यांच्या डोक्यात चालू झाला.
पटकन भजं संपवून त्यांनी दुसरे उचलले आणि बाजुला पडलेलं शब्दकोड्याचं पान उचलून ते सोडवायला सुरुवात केली. अर्धं शब्दकोडं सोडवून झाल्यावर त्यांनी अजून एक भजं उचललं. आणि तोंडात कोंबलं. बाजुच्या पोराने पण एक भजं उचललं. तो एव्हाना हातातलं पुरवणीचं पान खाली टाकून “एंटरटेनमेंट” चं पान न्याहाळण्यात मग्न होता. भज्याचा एक तुकडा पडून करिनाच्या चंद्रमुखी चेहरयावर डाग पडला होता. सबनीसांनी पटकन अजून एक भजं उचललं. आता ते रेसमध्ये पुढे होते. आपल्या गोष्टींवर असा डल्ला मारणारया ह्या कालच्या पोराला धडा शिकवायचाच असा त्यांनी निश्चय केला. शेवटचं भजं उचलून त्यांनी कागदाच्या पुडिचा गोळा केला आणि त्या मुलाच्या पायाखाली फेकला. त्याने एकदा खाली बघितलं आणि बाजुच्या पेपरचं भविष्याचं पान वेगळं काढून शांतपणे त्यात डोकं घातलं.
समोरच्या पोरांच्या एव्हाना लक्षात आलं होतं की काहितरी गंमत चालू आहे. त्यांची आई पण पोरं शांत झाली म्हणून जरा खुश झाली होती. ती पण आता कोण जिंकतय ह्याचा विचार करत होती. त्यांचा बाप मात्र डावीकडे डोकं करून झोपला होता.
गाडी स्लो झाली. “ठाणा, उतरणार का?” असे प्रश्न कानावर पडताच सबनीसांच्या लक्षात आलं की आता वेळ फार थोडा उरला आहे. त्यांनी आपल्या हातातलं शब्दकोड्याचं पान समोर धरलं. शांतपणे त्याचे बारीक बारीक तुकडे फाडले. “हे तुम्हाला मॅनर्स शिकवण्यासाठी” असे म्हणून त्यांनी त्या पोराच्या समोर ते हिमवर्षावासारखे सोडले. त्याने ते शांतपणे खाली झटकले आणि करिनाचे पान उलटून तो दिपिकाच्या निरीक्षणात मग्न झाला.
वर ठेवलेली ब्रिफकेस अव्यक्त संतापाने खेचून सबनीस दाराकडे जायला निघाले. गाडिने कचकन ब्रेक मारला. तोल जाऊन त्यांची ब्रिफकेस कॉर्नरवर आपटली. मनातल्या मनात पुर्ण दिवसाला एक शिवी घालून ते बॅग बंद करायला वळले. उघड्या ब्रिफकेसमधून भजी डब्यात पडली होती आणि तेलकट कागदातून बिझी बी त्यांच्याकडे बघत होता.
0 Comments:
Post a Comment
<< Home