पडू अाजारी...
Note: To read this post, your browser needs to be able to display Devanagari fonts.
लहानपणी अाजारी पडलो की अाजी एक गाणं म्हणायची.
"पडू अाजारी मौज हीच वाटे भारी ..." जणू काही अाजारी पडलं की सगळं काही हातात मिळतं अाणि शाळेला पण सुट्टी अशा अर्थाचं ते गाणं होतं. पुढचं गाणं काही अाठवत नाही. पण अजूनही अाजारी पडलो की मला पहिली अाठवण होते ती माझ्या अाजीची, वडलांच्या अाईची.
कर्जतच्या जवळ कोंढाणं म्हणून एक गाव अाहे. एकदा मी तिथं कुठल्याश्या उत्सवाच्या निमित्तानं गेलो होतो. भर पावसाचे दिवस. अन त्यात मला झालेली चिकार सर्दी. वर तिथं मी काय तेलकट खाल्लं हे तो रामच जाणे. पण मला शेवटचं अाठवतं ते म्हणजे मी टेम्पोतून कसाबसा उतरलो अाणि थेट घरी गेलो. काहीही सुचत नव्हतं अाणि डोकं एकदम जड झालेलं. सगळं खाल्लेलं घशाशी अालेलं.
घरी गेल्यावर अाजीनं फर्स्टक्लास चहा बनवून दिला अाणि दडपे पोहे खायला दिले. मग मी मस्तपैकी अाजीची गोधडी (तिला मी 'लाल' म्हणतो, ती वेगळीच स्टोरी अाहे) घेऊन अाणि चहा, पोहे अाणि एक पुस्तक घेऊन वाचत बसलो. नंतर छानपैकी पातीचहा पण प्यायलो. बरं कधी वाटलं ते कळलंच नाही.
गेले दोन दिवस मला खूप बरं नव्हतं. सर्दी, खोकला, ताप ... एकंदरीत तब्ब्येतिची तुतारी वाजली होती. पण अाता बरं नसेल तर जवळ घ्यायला अाणि थोपटायला अाजी नसते. फक्त तिची गोधडी असते अाणि अाठवणी.
1 Comments:
कोंदिवडे म्हणायचे आहे का? या गावापासूनच वर राजमाचीवर जायला रस्ता आहे, मागे रेल्वेची घाटातली वाट व समोर राजमाचीची चढण. . .वर चढताना कोंढाणे लेणी लागतात. . .या सगळ्याची आठवण आली
खरंय लहानपणी आजारी पडण्यात मजा असते. . .
Post a Comment
<< Home