Wednesday, October 15, 2008

"आधी भरा मग बोला" - २

कौस्तुभ शांतपणे घरी आला. दोन दिवस झाले, चार दिवस झाले. कोणाचा फोन आला नाही.

पुढच्या आठवड्यात कौस्तुभ परत जीम ला गेला.

“मी बिलासंदर्भात आलोय. तुम्ही म्हणाला होतात दुसरया दिवशी फोन करणार म्हणून. सात दिवस झाले. आजच्या आज हा चार्ज कॅन्सल करा बघू".

“तुम्ही एक काम करा साहेब. मनोज आहे आत्ता जीममध्ये. तुम्ही वर जाऊन त्याला बोलावता का? त्याने खात्री केली की तुम्ही नव्हता जादा तास घेतला तर रद्द करते आत्ताच्या आत्ता.” आज रिसेप्शनला वेगळीच मुलगी होती. तिने कानाला लावलेला मोबाईल खाली न ठेवता बिल परत देत सांगितले.

“म्हणजे मला लावलेला चुकिचा चार्ज कॅन्सल करण्यासाठी मीच फिरत बसू की काय लोकांना शोधत?”

“थांब हं पाच मिनिटात फोन करते. बरं दोन मिनिटांत.” असं म्हणून आणि फोन खिशात ठेवून ती मुलगी वर गेली.

ती पाच मिनिटांत खाली आली फोनवर बोलत बोलत.

“सॉरी हं. तो नाही आहे वर. आम्ही उद्या फोन करू तुम्हाला”.

“तुमच्या लक्षात येत नाही आहे. आठवडा झाला बिल येऊन. आता भरले नाही म्हणून तुम्हीच लेट फी लावाल मला. त्याचं काय?”

“बरोबर आहे साहेब तुमचं. जास्त दिवस ड्यू राहिली तर लेट फी लावू आम्ही नियमांप्रमाणे.

“कुठून शोधून आणतात ह्यांना देव जाणे” असा विचार करून कौस्तुभने बाईकवर टांग टाकली आणि तेव्हढ्यात त्याला मनॊज दिसला.

“बरं झाला बाबा भेटलास. वैताग आणला आहे तुमच्या स्टाफने. तुच काय ते सांग त्यांना. घरी बाबा रोज विचारतात. प्रश्न अडिचशेचा नाही रे. पण एवढी मगजमारी काय त्यासाठी.”

“टेन्शन घेऊ नकोस यार. मी सगळं फिक्स करतो.”

दुसरया दिवशी कौस्तुभ संध्याकाळी घरी आला तर अजून एक बिल पडलेलं. उघडून बघतो तर काय, त्यात आधिच्या अडिचशे रुपयांवर अजून पन्नास रुपये लेट फी लावलेली. तो तडक परत गेला.

“हॅलो सर. हाऊ कॅन आय हेल्प यू?” आज रिसेप्शनवर वेगळंच कोणितरी होतं.

“थॅंक्स. काय सध्या मंदी आहे का?”

“साहेब, समजलो नाही”.

“हे बघा समजतंय का? हा काय चावटपणा आहे हो तुमचा? आधी चुकिचे बिल लावता. ते रद्द करायचे राहिले दूरच, त्यावर लेट फी लावता?

“बघतो हं साहेब. काय नाव काय तुमचं?”

“कौस्तुभ साठे. हे माझं मेंबरशीप कार्ड”.

“अकाऊंट क्लिअर आहे साहेब. कॅन्सल केला आहे आम्ही तो चार्ज. ते बिल आधी पोस्ट केलं असेल.”

“नक्की? परत बघा”.

“नक्की साहेब. तुम्ही आरामात घरी जा.”

0 Comments:

Post a Comment

<< Home