"आधी भरा मग बोला" - ३
आठवडा गेला. कौस्तुभचे नेहमीचे कामकाज चालूच होते. रूटीनप्रमाणे कॉलेज, टेनीस, जीम कशात काही बदल नव्हता. पुढच्या आठवड्यात त्याला ट्रिपला जायचे होते मित्रमैत्रिणींबरोबर त्याचीही तयारी चालूच होती. किहिम, मुरूड-जंजिरा ह्या सगळ्या गडबडीत त्याचे कशाकडेच लक्ष नव्हते. आख्ख्या ग्रुपबरोबर विकेंड कसा गेला हे कोणालाच कळले नाही. कॉलेजचे शेवटचे वर्ष. त्यामुळे रविवारचा सूर्य कधी मावळूच नये असे सर्वांना वाटत होते. सगळ्यांना घरी परतायला सोमवारची पहाट उजाडली.
आलेली पत्रं बघताना कौस्तुभचे लक्ष एका बिलाकडे गेले. आणि तो हसतच सुटला.
“काय रे काय झालं एवढं हसायला. काल तर नर्व्हस होतास.” आईने विचारलं.
“अगं आई तुच वाच हे”. असं म्हणून त्याने बिल आईकडे दिले.
“मला वेळ नाही आहे. कामं आहेत. तुच निस्तर काय ते”.
“ठिक आहे. अर्ध्या तासात आलोच मी”. असं म्हणून आणि बाईकवर टांग टाकून तो घराबाहेर पडला.
“अहो, हे बिल बघता का?” कौस्तुभने हसतच रिसेप्शनवरच्या मुलीला विचारले.
“सर, त्यात काय बघायचंय. लेट फी आहे. भरून टाका. बरोबरच असेल”.
“अहो, बरोबरच काय असेल? हे पहा. माझी आधीची फी रद्द केली आहे. आणि ती भरली नाही म्हणून त्यावर लेट फी लावली आहे. मुळची फी रद्द केल्यावर त्यावर लेट फी कशी लावता तुम्ही?”
“मोना, हे बघ काय म्हणतायंत ते. त्यांना बिल भरायचं नाही असं म्हणतायंत”.
“अहो, भरायचं नाही काय? मी म्हणतोय की हे बिल मला येताच कामा नये”.
आता मोनाने बिल हातात घेतलं. “आलं लक्षात काय गडबड आहे ती. आम्ही तुमचं आधीचं बिल कॅन्सल करतोयं पण ते भरलं नाही म्हणून लेट फी लावतोय. सिस्टीममध्ये गडबड असेल आमच्या. तुम्हाला अकाउंटींग फोन करेल. आम्ही बिल कॅन्सल करू शकत नाही”.
“हे बघा. मागच्या वेळेस असंच झालं. आठवडा होऊन जातो, कोणी फोन करत नाही फक्त बिल पाठवता”.
मोनाने शांतपणे एक कार्ड कौस्तुभच्या हातात दिलं. “आता तुम्हीच उद्या फोन करा अकाउंटींगला उद्या”.
कपाळावर हात मारत कौस्तुभ घरी आला तर आई म्हणाली, “अरे बरं झालं आलास. एक बिल पडलंय पलंगावर. तुझ्याच नावाचं आहे. मोबाईलचं आहे वाटतं”.
“हॅलो, मी कौस्तुभ साठे बोलतोय. मला तुम्ही बिल पाठवलंय दोन हजाराचं. पण मी तुमचा कस्टमरच नाही आहे. जरा चेक करता का, काय गडबड आहे ती?”
“सॉरी सर. बिल चूकीचं असणं शक्यच नाही. आमचं धोरणच आहे, “आधी भरा मग बोला”.
0 Comments:
Post a Comment
<< Home